नैतिकतेच्या मुद्दय़ावर राधाकृष्ण विखेंचा राजीनामा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुत्र सुजय यांनी भाजपात वाजतगाजत प्रवेश केल्याने भाजपा-शिवसेना सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला राहिला नसल्याने विरोधी पक्षनेतेपदावरून दूर होत असल्याचे त्यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे, असे सूत्रांकडून समजते.

सुजय विखे यांच्या उमेदवारीसाठी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नवी दिल्लीला वारी केली. काँग्रेसच्या उमेदवार निवड समितीची सोमवारी नवी दिल्लीत बैठक झाली. या समितीमध्ये महाराष्ट्रातून राधाकृष्ण विखे-पाटील व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आहेत. या बैठकीतच्या निमित्ताने विखे-पाटील यांनी थेट सोनिया गांधी यांच्यापासून काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी तसेच महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. नगरमधील जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यास तयार नाही. जागावाटपात नगरची जागा आमची आहे आणि नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱया क्रमांकावर असल्याचे सांगत राष्ट्रवादीने नगरवरचा दावा सोडला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मन वळवण्यासाठी राहुल गांधी यांनी प्रयत्न करावेत यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. पण शरद पवारांशी बोलण्यास सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी नकार दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील प्रचंड नाराज झाले आहेत.

राज्यातील विरोधी पक्षनेत्याचा मुलगाच भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे काँग्रेसची राज्यातच नव्हे, तर देशपातळीवर नाचक्की झाली आहे. काँग्रेसने साथ न दिल्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील अस्वस्थ आहेत. पुत्रप्रेमापोटी सुजयला साथ द्यायची तर काँग्रेससाठी अडचणीचे होईल आणि काँग्रेससोबत राहिलो तर मुलाला साथ दिली नाही असा संदेश जाईल अशा राजकीय कात्रीत राधाकृष्ण विखे-पाटील सापडले आहेत. त्यामुळे काँग्रेसला रामराम ठोकण्याचा विचारही राधाकृष्ण करत असल्याचे समजते. सध्या दिल्ली मुक्कामी असलेले विखे-पाटील याच काळात काँग्रेस पक्षश्रेष्ठाRकडे राजीनामा देऊन महाराष्ट्रात परतणार असल्याचे सांगण्यात येते.

राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रीपदाची माळ गळय़ात पाडून घेण्याचे त्यांचे प्रयत्न होते अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर नियुक्ती झाल्यानंतरही विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी भाजपला अडचणीत न आणता भाजपला अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा काँग्रेसमधील नेत्यांचाच आरोप आहे. त्यामुळे सुजयपाठोपाठ राधाकृष्ण विखे-पाटीलही भाजपमध्ये प्रवेश करणार असे उघड बोलले जात आहे.

पुत्र सुजय भाजपात दाखल,राधाकृष्ण नाही म्हणतात, पण…

मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी आपण विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार नसल्याचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर विखे-पाटील यांनी हा खुलासा केला, मात्र त्यांनी राजीनामा दिला असल्याचे काही काँगेस नेत्यांनीच खात्रीपूर्वक सांगितले.

नगरची जागा काँग्रेसला सोडण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आडमुठेपणा आणि दिल्लीदरबारी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेले शेवटचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आज अखेर डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरमधून त्यांची लोकसभेची उमेदवारीही निश्चित केल्याचे जाहीर केले आहे. नगरमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात  असतानाच भाजपच्या व्यासपीठावरूनच राधाकृष्ण विखे -पाटील यांनाही सुजय यांचा निर्णय पटेल असे जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.