
शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष तथा पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर गुरुद्वारा माता साहिब देवाजी मुगट येथे दर्शन घेऊन परत येत असताना सेवादाराने तलवारीने हल्ला केला. सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान दाखवल्याने बादल या प्राणघातक हल्ल्यातून बचावले. मात्र त्यांच्या हातावर मोठा घाव झाला असून नांदेड येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल हे बुधवारी दुपारी गुरुद्वारा दर्शनासाठी नांदेडात सहकुटुंब आले आहेत. सुखबीरसिंग बादल आणि त्यांच्या पत्नी खासदार हरसिमरत काwर यांच्यासह कुटुंबाने आज सकाळी सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेतले. त्यानंतर बादल हे सहकुटुंब गुरुद्वारा माता साहिब देवाजी मुगट येथे दर्शनासाठी गेले. दर्शन घेतल्यानंतर पायऱ्या उतरून खाली येत असताना एका सेवादाराने त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. मात्र त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखून हा हल्ला परतवून लावला. मात्र बादल यांच्या हातावर वार बसला. सेवादाराने केलेल्या हल्ल्यात सुखबीरसिंग बादल यांच्या हाताला मोठी जखम झाली असून त्यांना तात्काळ नांदेड येथील यशोसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या झटापटीत एसपीयूचे पोलीस निरीक्षक संतोष पेंद्रे हे देखील जखमी झाले.
झेड प्लस सुरक्षा असतानाही हल्ला
सुखबीरसिंग बादल यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिलेली आहे. सुरक्षा रक्षकांचे अभेद्य कवच असतानाही हल्ला झाल्यामुळे एकूणच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटना घडताच एका हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कोण आहे हल्लेखोर?
सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्याचे नाव जसपालसिंग (62) असल्याचे सांगण्यात आले. तो मूळचा पुण्याचा राहणारा असून, तेथील न्यायालयात त्याने वकील म्हणून काम केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो गुरुद्वारा माता साहिब देवाजी मुगट येथे सेवादार म्हणून काम करत होता. जसपालसिंग याने बादल यांच्यावर हल्ला का केला, याचे कारण समजू शकले नाही.
































































