
सामना ऑनलाईन । इंदूर
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी इंदूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. भाजपकडून इंदूर मतदार संघातील उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आली नसल्याने त्यांनी थेट पत्र लिहून आपण निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
भाजपने इंदूरमधून लोकसभेसाठी आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. मी यासंदर्भात आधी देखील पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली होती आणि निर्णय त्यांच्यावर सोडला होता. तरी देखील त्यांच्या मनात संभ्रम असल्यासारखे दिसते आहे. म्हणून मी घोषणा करते की मला आता लोकसभा निवडणूक लढायची नाही. तेव्हा पक्षाने अत्यंत मुक्तपणे निर्णय घ्यावा, असे सुमित्रा महाजन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. पत्र प्रसिद्ध करून दिली माहिती #LokSabhaElections2019 pic.twitter.com/DLeJ3V57hh
— Saamana (@Saamanaonline) April 5, 2019
इंदूरची जनता, पक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांविषयी आदर आणि प्रेम व्यक्त करत त्यांनी साऱ्यांचे आभार देखील मानले आहेत. तसेच यानंतर पक्ष लवकरच आपला उमेदवार जाहीर करतील अशी अपेक्षा देखील त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.
सलग आठ वेळा लोकसभेवर निवडून जाणाऱ्या भाजप उमेदवार
लोकसभा निवडणुकांमध्ये सुमित्रा महाजन यांनी पराभव कधी पाहिलेला नाही. त्या सलग आठ वेळा या मतदार संघातून जिंकून लोकसभेत गेल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रकाशचंद्र सेठी यांना पराभूत करत हा मतदार संघ जिंकला होता. यंदाची निवडणूक ही सुमित्रा महाजन यांच्यासाठी नववी निवडणूक ठरली असती. मात्र त्यांनी आता निवडणूक निवडण्यास नकार दिला आहे. गेल्या निवडणुकीवेळी 75 वर्षांच्या सुमित्रा महाजन यांनी 2014 ही आपली शेवटची निवडणूक असेल असे स्पष्ट केले होते.




























































