
भंडारा मोहाडी तालुक्यातील वरठी येथे असलेल्या सनफ्लॅग आयर्न अन्ड स्टील कंपनीत मंगळवारी पहाटे 03.15 वाजता स्फोट झाला. या स्फोटात तीन कामगार जखमी झालेत. जखमी श्रमिकांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आले.
घटनेच्यावेळी कंपनीत काम करणाऱया आणखी आठ कामगारांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आलेत. कंपनीतील एसएमएस या विभागातील एलएचएफ युनिटमध्ये ही घटना घडली. घटनेचे मूळ कारण अद्याप अस्पष्ट आहे. हिटिंग फरनेसमध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने तारांबळ उडाल्याचे श्रमिकांनी सांगितले. भागात कार्यरत तीन श्रमिक यात भाजले आहेत. तंत्रज्ञ नामदेव झंझाड, अभियंता सागर गभने व कंत्राटी कामगार हटवार यांचा जखमीत समावेश आहे. त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. स्पह्ट एवढा भयानक होता की, कंपनीतील जवळपास असलेला परिसर हादरला. या अपघातात कंपनीतील साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

























































