शिवसेना आणि धनुष्यबाण – जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी आहे. आज यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांपुढे पाच ते सात मिनिटे प्राथमिक सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेत निवडणूक आयोगाने ही सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पुढे ढकलली आहे.

शिवसेनेशी गद्दारी करणाऱया एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाने शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह आपल्याला मिळावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. सर्वेच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार केंद्रीय निवडणुक आयोगापुढे या विषयची सुनावणी पार पडणार आहे. यासंदर्भातील सुनावणीस सुरुवात करण्यापूर्वी मुळ शिवसेना पक्ष आणि शिंदे गटाला कागदपत्र सादर करण्यास सांगण्यात आले होते.

दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींकडून शिवसेना पक्षासंदर्भात कागदपत्र सादर झाल्यावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आजपासून युक्तिवादास सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. मात्र, मुख्य निवडणूक आयक्तांनी या विषयात फक्त प्राथमिक चर्चा करून सुनावणी पुढे ढकलली. आता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ही सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूचे वकील तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

आयोगाने गांभीर्याने हा विषय हाताळावा – अनिल देसाई

निवडणूक चिन्हाबाबतचा विषय संवेदनशील आहे. राजकीय पक्ष हा कायमस्वरुपी असतो. पक्षाला घटना धोरण असते. एका रात्रीतून पक्ष तयार होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे आलेली सर्व कागदपत्र व प्रतिज्ञापत्रे यांची बारकाईने छाननी करावी आणि त्याची सत्यता पडताळून पहावी, अशी शिवसेना पक्षाची भूमिका असल्याचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.