
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जगमित्र साखर कारखाना जमीन हडपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला स्थगिती मिळविण्यासाठी मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने मुंडे यांची बाजू ऐकून घेण्याची संधी दिल्याने त्यांना तूर्तास दिलासा मिळाला असून यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
अंबाजोगाईतील जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीनप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश संभाजीनगर खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी मंगळवारी दिला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे मुंडे यांनी बचावासाठी धावाधाव सुरू केली आहे. संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवार, 14 जून रोजी न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
प्रकरण काय?
अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील जमीन शासनाला अंधारात ठेवून हडप केल्याप्रकरणी भादंवि 420 कलमान्वये तसेच शासनाच्या परवानगीशिवाय बनावट कागदपत्रांआधारे हस्तांतरित करण्यात आल्यामुळे भादंवि 467, 468 आणि 471 कलमान्वये दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात यावा यासाठी राजाभाऊ फड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने दाखल कागदपत्रांची तपासणी करून प्रथमदर्शनी गुन्हा दिसत असल्याने याप्रकरणी बर्दापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले.




























































