
मार्केटमध्ये एखादे नाणे चालले की त्याचीच चर्चा सर्वाधिक होते. असच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत होत आहे. अजित पवार मंत्रालयात असतानादेखील काहीही झाले तरी प्रत्येक गोष्टींसाठी माझ्या भावावर खापर फोडून त्यावर चर्चा होते. यापुर्वी ‘भूकंप’ झाला तर तो शरद पवार यांनी केला, अशी चर्चा व्हायची. पण त्यामध्ये त्यांची काय चूक, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. मी पक्षातल्या सगळ्या आमदार- खासदारांशी बोलत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आमदारांना, माध्यम आणि नागरिकांसाठी नेहमी उपलब्ध असतात. त्यामुळे जर कोणी नाराज असेल, तर अर्थातच ते आतापर्यंत आमच्या कानावर आले असते. आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती नाराज असते तेव्हा ती घर सोडून जात नाही, रूसून बसते. त्यामुळे तुमच्या म्हणण्याला जर काही तथ्य असेल तर मी नक्कीच नाराज असलेल्या 40 आमदारांसोबत चर्चा करीन. शरद पवार नेहमी कमी बोलावे असे सांगतात. अजित पवार कमी बोलतात. माध्यमांनी खात्री केली तर, अजित दादा विधानभवनात काय करीत आहे, ते समजेल, असेही त्या म्हणाल्या.





























































