
ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना ’पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त झाल्यानिमित्ताने त्यांना ‘स्वरनभीचा ध्रुव’ ही विशेष उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले. आर्च एंटरप्रायझेस आणि अटल सेवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वरनभीचा ध्रुव’ या सांगीतिक स्वरसोहळय़ात त्यांना ही उपाधी देण्यात आली तसेच चाफ्याची परडी, पारंपरिक पुणेरी पगडी, महावस्त्र, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि 25 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात संपन्न झालेल्या या सोहळय़ाला ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, संगीतकार श्रीधर फडके, पार्श्वगायिका साधना सरगम, आमदार पराग अळवणी यांची विशेष उपस्थिती होती. स्वरनभांगणातील सूर्य, चंद्र म्हणून अवघ्या रसिकांनी लतादीदी व आशाताई यांना जसे हृदयसिंहासनी विराजमान केले आहे तसेच सुरेश वाडकर यांनादेखील रसिकांनी ध्रुवताऱयाप्रमाणे मनात अढळपद बहाल केल्याचे गौरवोद्गार यावेळी राजीव खांडेकर ह्यांनी काढले. श्रीधर फडके यांनी सुरेश वाडकर यांच्यासोबतचे अनेक प्रसंग व त्या प्रसंगातील गंमतीजमती सांगितल्या. साधना सरगम यांनी सुरेश वाडकर यांचे मराठी व हिंदी स्वरसृष्टीतील योगदान हे अत्यंत पूजनीय असल्याची हृद्य भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाची संकल्पना विनीत गोरे यांची होती. कार्यक्रमात सहगायिका म्हणून विद्या करलगीकर यांनी गायक मंदार आपटे यांना उत्तम साथ दिली, तर आनंद सहस्रबुद्धे यांच्या संगीत संयोजनाखालील वादकवृंदानेदेखील सर्व गीतांची रंगत द्विगुणित केली. वाडकरांनी सादर केलेली गाणी हा कार्यक्रमाचा कळसाध्याय ठरला. सचिन गुंजाळ, अभिजीत सरदेसाई, सुनील मोने, आयोजिका अर्चना गोरे आणि अंजली सामंत तसेच अभिजीत सामंत यावेळी उपस्थित होते.






























































