
विधानसभेत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ व गैरवर्तन केल्यावरून निलंबित केलेल्या भाजपच्या बारा आमदारांनी आज संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभनावर भेट घेतली. महाविकास आघाडीच्या सदस्यांनीच ‘हाथापाई’ केल्याचा कांगावा केला आणि याचा संपूर्ण अहवाल मागवण्याची विनंती या निलंबित आमदारांनी राज्यपालांकडे केली आहे.
भाजपचे निलंबित आमदार अॅड. आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली या सर्व निलंबित आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तक्रारीचे पत्र दिले आहे. केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाला आवश्यक असलेला एम्पिरिकल डेटा द्यावा असा ठराव मांडण्यात आला. हा ठराव मांडताना सभागृहाचे नियम, प्रथा, परंपरा पाळण्यात आल्या नाहीत, तसेच ओबीसी आरक्षणासारखा महत्त्वाचा विषय असताना त्यावर आमदारांना बोलू द्यावे अशी विनंती केली असता कोणलाही बोलू दिले नाही. या ठरावात मंत्र्यांनी मांडलेले मुद्दे ओबीसी आरक्षणाला मारक ठरणारे होते. त्यामुळे आम्हाला बोलू देण्याची मागणी केली, पण बोलण्यास दिले नाही. उलट भाजपच्या आमदारांवर शिवीगाळ केल्याचा खोटा ठपका ठेवून बारा सदस्यांना निलंबित करण्यात आले. लोकशाहीच्या प्रथा परंपरा गुंडाळून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केल्याचा दावा या पत्रात केला आहे.





























































