सलामीच्या लढतीत स्वीडनचा हिंदुस्थानवर 3-0 असा विजय 

352

पुढील वर्षी हिंदुस्थानात होणार्‍या अंडर -17 महिला फुटबॉल विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून आशियाई फुटबॉल महासंघाने ( एएफसी ) युरोपियन फुटबॉल महासंघ आणि अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघ यांच्या सहकार्याने मुंबईत आयोजिलेल्या महिला अंडर -17  तिरंगी फुटबॉल स्पर्धेचा शानदार शुभारंभ शुक्रवारी झाला. सलामीच्या स्वीडनविरुद्ध यजमान हिंदुस्थान लढतीसाठी अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुल मैदानावर जल्लोषी वातावरण होते. मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीने लढतीला आलेल्या युवा फुटबॉलप्रेमींत आगळे चैतन्य संचारले होते.

सलामीच्या लढतीत आंतरराष्ट्रीय अनुभवात  नवख्या असलेल्या हिंदुस्थानी महिला संघाने बलाढ्य स्वीडन संघाला स्तुत्य अशी लढत दिली; पण अखेर अनुभवी स्वीडनने लढतीत 3-0 अशी बाजी मारत सलामीची लढत जिंकली.

महिलांच्या अंडर 17 फुटबॉल स्पर्धेत सलामीला पराभव पत्करणार्‍या यजमान हिंदुस्थानला आता आशियाई संघ थायलंडशी झुंज द्यावी लागणार आहे. स्वीडनच्या आक्रमक फळीने पूर्वार्धात हिंदुस्थानी गोलपोस्टवर जोरदार आक्रमणे रचत 2-0 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात मात्र हिंदुस्थानी बचाव काहीसा भक्कम झाला. त्यामुळे पाहुण्यांना अधिक गोल नोंदवता आले नाहीत. हिंदुस्थानी फॉरवर्डस्नी 11व्या, 21व्या 64व्या  आणि 75व्या मिनिटाला मिळालेल्या सोप्या संधी गमावल्याने त्यांना या लढतीत एकही गोल नोंदवता आला नाही. स्वीडनच्या वतीने माटिल्डा विनबर्ग (4 थे मिनिट ), इडा विंडेनबर्ग (25 वे मिनिट) आणि मोनिका जूसु बाह ( 91वे मिनिट ) यांनी गोल नोंदवले.

आदित्य ठाकरे यांनी घेतला लढतीचा आनंद 

मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल संघटनेचे ( एमडीएफए ) अध्यक्ष, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे अंधेरीतील या आंतरराष्ट्रीय फुटबॉल लढतीला आपल्या महत्त्वपूर्ण कामातून वेळ काढून उपस्थित होते. त्यांनी या संपूर्ण लढतीचा मनमुराद आनंद घेतला आणि शहाजीराजे क्रीडा संकुलातील तयारीची मुक्तकंठाने स्तुती केली. मुंबई फुटबॉल अरेनात खेळणार्‍या स्वीडिश महिला फुटबॉल संघाचेही त्यांनी खास आभार मानले. देशातील फुटबॉल विकासाची वाटचाल योग्य दिशेने होतेय याबद्दल आदित्य ठाकरे यांनी अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघालाही धन्यवाद दिले. याप्रसंगी त्यांच्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव विजय पाटील, शिवसेना सचिव आदेश बांदेकर आणि एमडीएफएचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या