हिंदुस्थानी वंशाचा आणि मूळ मुंबईकर रणजीपटू असलेल्या वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या इफ्तिखार अहमद आणि शादाब खानला रोखण्याची किमया केली आणि अमेरिकेला टी-20 वर्ल्ड कपमध्ये सनसनाटीपूर्ण विजय मिळवून दिला. उद्घाटनीय सामन्यात कॅनडावर मात करणाऱया अमेरिकेच्या पाकिस्तानविरुद्धच्या धक्कादायक विजयानंतर सुपर एटमध्ये त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आयर्लंडविरुद्धचा विजय त्यांना सुपर एटची सुवर्णसंधी देऊ शकतो.
पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमच्या कसोटी क्रिकेटला साजेशा अशा 22 चेंडूंत 7 धावा अशा धक्कादायक खेळीने साऱयांनाच हादरवले. त्यानंतर केलेल्या फटकेबाजीमुळे त्याने 43 चेंडूंत 44 धावा केल्या असल्या तरी पाकिस्तानची धावगती फारच मंदावली होती. 16 षटकांत 6 बाद 126 अशा बिकट स्थिती असलेल्या पाकिस्तानला शाहीन आफ्रिदीच्या 16 चेंडूंतील 23 धावांनी 159 धावांपर्यंत पोहोचविले. अमेरिकेच्या नोस्तुश केनजिगे, सौरभ नेत्रावळकर आणि अली खान यांच्या अचूक माऱयानेच पाकिस्तानी फलंदाजांना जखडून ठेवले. येथेच अमेरिकेने सामन्यात आघाडी घेतली.
मोनांकची दमदार फलंदाजी
अमेरिकन गोलंदाजांनी पाकिस्तानला रोखल्यानंतर पाकिस्तानच्या वेगवान माऱयाला जबरदस्त प्रत्युत्तर देण्याची करामत अमेरिकन कर्णधार मोनांक पटेलने आंद्रिस गोज आणि अॅरोन जोन्सच्या साथीने दिली. मोनांक आणि आंद्रिसने 68 धावांची भागी रचत अमेरिकेला विजयपथावर नेले. हारिस रऊफने गोसचा त्रिफळा उडवत ही जोडी पह्डली. मग पुढच्याच षटकात पटेलला बाद करत अमेरिकेला अडचणीत आणले. सलग षटकांत गोस आणि पटेलला बाद करून पाकिस्तानने अमेरिकेवर दबाव वाढवला. पाकिस्तानी गोलंदाजांनी भेदक मारा करत 36 चेंडूंत 47 धावांची गरज असलेल्या अमेरिकेसमोर 6 चेंडूंत 15 धावांचे आव्हान दिले. या क्षणाला पाकिस्तान विजयासमीप पोहोचला होता, पहिल्या 3 चेंडूंत केवळ 3 धावा देत आमीरने पाकिस्तानची सामन्यावरची पकड मजबूत केली, पण 3 चेंडूंत 12 धावांची गरज असताना आधी जोन्सने षटकार ठोकला आणि मग एका चेंडूंवर 5 धावांची गरज असताना नितीश कुमारने चौकार ठोकत अमेरिकेला बरोबरी साधून देत सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.
सुपर पॉवर अमेरिकाच सुपर
अमेरिकेने सुपर ओवरमध्ये प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद आमीरच्या भरकटलेल्या गोलंदाजीच्या जोरावर 18 धावा काढल्या. या षटकात जोन्सने केवळ एक चौकार मारला, तर आमीरने 3 वाइड चेंडू टाकत अमेरिकेला सहा धावांची भेट दिली. या वाइड चेंडूंवर तीन धावाही काढल्या. आमीरने गोलंदाजीत घोर निराशा केली. त्यानंतर कर्णधार मोनांक पटेलने विश्वासाने सौरभ नेत्रावळकरच्या हाती चेंडू दिला आणि सौरभने आपल्या अचूक माऱयापुढे पाकिस्तानी दिग्गजांना रोखले. 3 चेंडूंत 5 धावा दिल्यानंतर चौथा चेंडू वाइड आणि पाचव्या चेंडूवर चार बाईज दिल्यामुळे सामन्याचा थरार वाढला होता. 2 चेंडूंवर 9 धावांची गरज होती, पण त्याने शादाबला केवळ दोन धावा दिल्या आणि मग शेवटच्या चेंडूवरही केवळ एकच धाव देत अमेरिकेला टी-20 वर्ल्ड कपमध्ये संस्मरणीय आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला.