टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड, चार वर्षांनंतर अश्विनचे कमबॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाची आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी बुधवारी निवड करण्यात आली. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बेंचवर बसलेल्या रविचंद्रन अश्विनचे हिंदुस्थानी संघात कमबॅक करण्यात आले आहे. तब्बल चार वर्षांनंतर या अनुभवी ऑफस्पिनर गोलंदाजाचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या संघाचा मेण्टॉर असणार आहे. सूर्यकुमार यादव, इशान किशन, राहुल चहर व वरुण चक्रवर्ती हे खेळाडू पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहेत. यूएई व ओमान येथे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे.

चार फलंदाज अन् दोन यष्टीरक्षक

हिंदुस्थानी संघात चार फलंदाज व दोन यष्टीरक्षकांची निवड करण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहली, रोहीत शर्मा, लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांच्या खांद्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. तसेच रिषभ पंत व इशान किशन हे यष्टीरक्षणाची भूमिका पार पाडतील.

दोन अष्टपैलू अन् पाच फिरकी गोलंदाज

टीम इंडियाच्या या संघात हार्दिक पांडय़ा व रवींद्र जाडेजा या दोन अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर यांच्यासह रवींद्र जाडेजा या फिरकीवीरांवर टीम इंडियाची मदार असणार आहे.

तीन वेगवान गोलंदाज

जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व भुवनेश्वरकुमार या तीन वेगवान गोलंदाजांची
टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आली आहे. यूएईतील खेळपट्टय़ा या फिरकी गोलंदाजांना जास्त मदत करतील याकडे लक्ष देऊन कमी वेगवान गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. हार्दिक पांडय़ाही मध्यमगती गोलंदाजी करू शकतो.

हिंदुस्थानचा चमू

विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांडय़ा, रवींद्र जाडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार, मोहम्मद शमी

राखीवमध्ये दोन मुंबईकर

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत जबरदस्त कामगिरी करणारा शार्दूल ठाकूर व दुखापतीमुळे गेला काही काळ बाहेर असलेला श्रेयस अय्यर हे दोन्ही मुंबईकर राखीव खेळाडू असणार आहेत. दीपक चहर याचीही त्यांच्यासोबत राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. शिखर धवन, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, जखमी वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देण्यात आलेली नाही.