लोकसभेत शिवीगाळ करणाऱ्या भाजप खासदारावर हक्कभंगाची कारवाई करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुजन समाज पार्टीचे खासदार कुंवर दानीश अली यांना भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांनी संसदेच्या सभागृहात शिवीगाळ केली. याविरोधात विरोधी पक्ष एकवटले असून काँग्रेस, डीएमके, राष्ट्रवादी आणि तृणमूल काँग्रेस अशा चार विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवून भाजप खासदारविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लोकसभेत गुरुवारी ‘चांद्रयान-3’ वर चर्चा सुरू असताना भाजप खासदाराने बसपा खासदाराला उद्देशून अपशब्द वापरले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपची नाचक्की झाली आहे. यासंबंधी भाजप नेते, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. विरोधकांनी पत्रात म्हटले की, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना एका विधानावरून सभागृहातून निलंबित केले, परंतु भाजप खासदाराविरुद्ध कोणतीही कारवाई का केली जात नाही? लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवणाऱया नेत्यांमध्ये अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश आहे. याचप्रमाणे डीएमके नेत्या कनीमोळी, तृणमूल काँग्रेसच्या खासदार अपरूपा पोद्दार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे पत्र पाठवले आहे. भाजप खासदाराला फक्त समज देऊन चालणार नाही. त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई व्हायला हवी, असे सुळे यांनी पत्रात म्हटले आहे.

– भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी बसपा खासदाराबद्दल वादग्रस्त आणि संतापजनक विधान केले आहे. हे वक्तव्य आक्षेपार्ह असून त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाची कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यासाठी लोकसभा सचिवालयाला नोटीस पाठवून ही मागणी केली आहे. रमेश बिधुडी यांचे वक्तव्य लोकसभेच्या प्रतिष्ठsला ठेच पोहोचवणारे आहे. नियमानुसार हे वक्तव्य हक्कभंग यात बसते. त्यामुळे यात हस्तक्षेप करीत प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवा, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.