
राज्यात सत्ताबदल होऊन भाजपची सत्ता येताच खुलेआम धमक्या देण्याचे प्रकार वाढले असून कायद्याचे राज्य अशी देशभर ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी ही चिंतेची व गंभीर बाब आहे. विशेषतः सत्ताधारी पक्षाचे मंत्री, खासदार व आमदारच डोळे काढण्याची, हायपाय तोडण्याची भाषा करत आहेत. राज्य सरकारने अशा सत्ताधारी गुंडांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, भाजपचे सरकार राज्यात आल्यापासून सत्ताधारी पक्षाच्या लोकांची गुंडगिरी वाढली आहे. “राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे हे प्रत्येक पोलीस अधिकाऱयाने लक्षात ठेवावे. जो अधिकारी हिंदू मुलांकडे वाकडय़ा नजरेने बघेल त्याचे डोळे जागेवर राहणार नाहीत’’, अशा शब्दांत भाजपचे आमदार धमकी देत असतील तर राज्यातील पोलीस अधिकारी काम कसे करतील. मुख्यमंत्र्यांच्या एका सत्ताधारी आमदारानेच हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. हे कमी काय म्हणून अमरावतीमध्ये खासदार, आमदार राणा पती-पत्नी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोलीस अधिकाऱयांशी हुज्जत घालतात, सरकारी कामात हस्तक्षेप करतात. पोलीस आयुक्ताची बदली झाल्याचे आमदार महोदय स्वतःच जाहीरपणे सांगतात. दादरमध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार करतो हे काय चालले आहे? हा महाराष्ट्र आहे की उत्तर प्रदेश? राज्यात मोगलाई आली आहे का?
महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासण्याचे काम करू नका
राज्यातील दोन महिन्यांतील हे प्रकार पाहता महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे याची कल्पना करवत नाही. महाराष्ट्राचा देशात नावलौकिक आहे, त्याला काळिमा फासण्याचे काम करू नका असेही पटोले यांनी ठणकावले.

































































