तब्बल आठ वर्षानंतरही तारुगव्हाण बंधाऱ्याचे काम अर्धवटच – माणिक केंद्रे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथरी

पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील मुदगल, ढालेगाव या उच्चपातळी बंधाऱ्याचे कामे पूर्ण होऊन काही वर्ष उलटली असतानाच याच नदीवरील तारुगव्हाण येथील उच्च पातळी बंधरा पूर्ण होण्याचा कालावधीसंपून तीन वर्ष पूर्ण झाली असतानाही हा बंधारा मागील ८ वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे सध्याच्या दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, पाण्याची मोठी गरज भागविणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या महत्वाकांक्षी योजनेचे ऐन दुष्काळात तीन तेरा वाजल्याचे चित्र पाथरी तालुक्यात निर्माण झाले आहे.

या वर्षाची दुष्काळी परिरिस्थती लक्षात घेता, शासन कोट्यावधी रुपयांचा खर्च करुन जनतेची तहान भागविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच तारुगव्हाण बंधाऱ्या सारखा महत्वकांक्षी प्रकल्प रखडल्याने या भागातील नागरिक, शेतकरी तसेच पशुधन यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गोदावरी नदीपात्रावरील मुदगल आणि ढालेगाव बरोबरच तारुगव्हाण हाही उच्च पातळी बंधारा शासनाने २०१० साली करण्याचा कार्यारंभ आदेश कंत्राटदार पियूष इंटरप्रायजेस संभाजीनगर या एजन्सीला देण्यात आला होता. त्यावेळी या बंधाऱ्यासाठी १२३.३२ कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून हा बंधारा जून २०१५ पर्यंत अंतिम मुदतीत पूर्ण होणे अपेक्षीत होते. या बंधाऱ्यांच्या पूर्णत्वानंतर २ हजार १०० हेक्टर शेती सिंचनाखाली येऊन या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार होता. पाथरी, परळी, माजलगाव या तालुक्यांनाही याचा फायदा होणार आहे. परंतु कुठे माशी शिंकली कळाले नाही ? शासनाला अपेक्षीत होते असे काहीच झाले नाही. या बंधाऱ्याचे काम पूर्ण होण्याची मुदत संपून तीन वर्ष उलटली. तरी हा बंधारा आजस्थितीला अर्धवट अवस्थेतच आहे. याची वाढीव रक्कम आता १६९.८४ कोटी रुपये ऐवढी झाली असून शासनाच्या म्हणण्याप्रमाणे ही काम आता ३१ डिसेंबर २०१८पर्यंत पूर्ण होणे अपेक्षीत होते. या बंधाऱ्याच्या कामावर आत्तापर्यंत एवूâण १२० कोटी रुपये खर्च झाला आहे. ३५ कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्र्यांनी महत्वकांक्षी योजनेत समावेश करून दिली आहे.परंतु या कामाची खरी गती मंदावली ती कंत्राटदार एजन्सी व शासनाच्या कमालीच्या उदासीनधोरणामुळे कारण या कंत्राटदार एजन्सीचे संबंधीत गुत्तेदार अरविंद रेड्डी हे मात्र तारुगव्हाण बंधाऱ्याच्या कामाच्या ठिकाणी येत नसल्याने हे काम वर्ष-वर्ष बंद आवस्थेत आहे. त्यामुळे तारुगव्हाण बंधाऱ्या सारखा लोकोपयोगी व महत्वकांक्षी प्रकल्प लवकर पूर्ण होऊन या ठिकाणी पाणी उपलब्ध झाल्यास या भागातील जनतेची गरैसोय टळणार आहे.

तारुगव्हाण बंधाऱ्याच्या कामाची गती वाळू अभावी मंदावल्याचा आरोप लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याने केला आहे. असे असतानाही बंधाऱ्या पूर्व व उत्तर बाजूस एकूण १ हजार ६०० ब्रास वाळू साठा चोरी गेल्याप्रकरणी या बंधाऱ्याचे कंत्राटदार अरविंद रेड्डी यांच्यावर पाथरी ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचेही पाथरीच्या तहसीलदार निलम बाफना यांनी सांगितले. कर्तव्यदक्ष व वाळू क्षेत्रात माहीर असलेले जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांनी मात्र या वाळू चोरीस दुजोरा दिल्याचेही बोलले जात आहे. कारण या वाळू चोरी प्रकरणी कोणतीही कठोर कारवाई अथवा जप्ती वसूली झाली नसल्यामुळे शासनाचा लाखों रुपयांचा महसुलही बुडाला आहे. तालुक्यातील घरकुल लाभधारकांप्रमाणेच जिल्हाधिकाऱ्यांनी तारुगव्हाण बंधाऱ्याच्या कामासाठी वाळू उपलब्ध करुन दिल्यास हा बंधारा लवकर पूर्णत्वास जाऊ शकतो.