
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील 450 कर्मचाऱयांना अखेर पाच महिन्यांपासून थकीत असलेले 300 रुपये दैनंदिन कोविड भत्ता 20 सप्टेंबरपर्यंत गणेश विसर्जनाआधी मिळणार आहेत. ही थकबाकी देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिले. महापौरांच्या अध्यक्षतेखाली आज पालिका प्रशासन आणि म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना पदाधिकाऱयांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई जिल्हा क्षयरोग कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या वेतनावर गेल्या 20 वर्षांपासून काम करीत आहेत. क्षयरोग रुग्णांसाठी औषधे घरपोच देणे, सर्वेक्षणात सहभाग घेणे, रुग्णांना मिळणारे अनुदान घरपोच देणे अशी कामे प्रामाणिकपणे करीत असतात. तर गेल्या दीड वर्षापासून हे सर्व कर्मचारी कोरोनाकाळातही स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत.
मात्र या काळात पालिकेने मंजूर केलेला दैनंदिन 300 रुपयांचा कोविड भत्ता ऑगस्ट ते डिसेंबर 2020 या कालावधीत दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर आज महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, संजय वाघ, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, डॉ. प्रणिता टिपरे आदी उपस्थित होते. दरम्यान, कर्मचाऱयांना किमान 30 हजार रुपये वेतन द्यावे, नियमानुसार अतिरिक्त भत्ते द्यावेत अशी मागणीही कर्मचाऱयांनी केली आहे.
समायोजनाबाबत निर्णय घ्या!
क्षयरोग नियंत्रणमधील 39 कंत्राटी कर्मचाऱयांना 2008 मध्ये पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱयांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करावी अशी मागणी कर्मचाऱयांनी केली आहे.
दरम्यान, क्षुल्लक अनावधानाने झालेल्या चुकीचे कारण देत कर्मचाऱयांना कामावरून काढण्याचे इशारे देण्यात येत आहेत. त्यामुळे वयाच्या चाळिशीत दुसरी नोकरी कुठे नोकरी शोधणार असा प्रश्न काही कर्मचाऱयांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणीही कर्मचाऱयांनी केली आहे.



























































