मानसिक त्रासाला कंटाळून शिक्षिकेची आत्महत्या, जामखेड पोलिसांत शिक्षक दाम्पत्यावर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या लग्नास विरोध केला व उसने दिलेले पाच लाख रुपये देण्यास नकार देऊन मानसिक त्रास दिल्याने शिक्षिकेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जामखेडमध्ये घडली आहे. याप्रकरणी शिक्षक दाम्पत्याविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतुकाबाई वाघोजी भिसे (वय 34) असे मयत शिक्षिकेचे नाव आहे. परमेश्वर धर्माजी बोडखे व मालुबाई परमेश्वर बोडखे (मूळ रा. नांदेड, हल्ली रा. शिक्षक कॉलनी, जामखेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

संतुकाबाई या कोपरगावातील एका माध्यमिक शाळेत शिक्षिका होत्या. त्यांचे लग्न 12 वर्षांपूर्वीच नांदेड जिह्यातील एका मुलासोबत झाले होते. मात्र, पतीसोबत पटत नसल्याने त्या वेगळ्या राहत होत्या. दरम्यान, संतुकाबाई आणि परमेश्वर यांची जुनी ओळख होती. यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. बोडखे हा पाटोदा तालुक्यात शिक्षक आहे. त्यामुळे तो सध्या जामखेडमधील शहरातील शिक्षक कॉलनीत राहत होता. त्यामुळे संतुकाबाई आणि परमेश्वर हे एकमेकांना भेटत होते. ते लग्नदेखील करणार होते. मात्र, परमेश्वरच्या पत्नीला त्यांच्या पेमप्रकरणाची माहिती झाली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाले. 9 जुलै रोजी संतुकाबाई परमेश्वरच्या घरी आली होती. त्यावेळी तिने विषप्राशन केले होते. त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यता आले. संतुकाबाई यांच्या आईला याची माहिती दिल्यानंतर त्यांनी तिला नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, 9 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत शिक्षिकेच्या आईच्या फिर्यादीवरून शिक्षक दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.