
‘क्लासचे पैसे भरायचे आहेत, तुमचा गुगल पे द्या‘ असे सांगून तिची ऑनलाईन 79 हजाराला फसवणूक केल्याची घटना शहरालगतच्या खेडशी येथे घडली. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद दिप्ती दत्ताराम साबळे (32, शिक्षिका, कस्तुरी निवास, खेडशी श्रीनगर, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिप्ती या अॅबॅकचे क्लासेस घेतात. 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वा. च्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. ‘दोन मुलांचे अॅडमिशन करायचे आहे, त्यासाठी आम्ही पैसे भरण्यास तयार आहोत. तुम्ही गुगल पे नंबर द्या असे सांगितले. दीप्ती यांनी क्लासेसची फी भरण्यासाठी गुगल पे नंबर दिला. यावेळी समोरच्या व्यक्तीने त्यांच्या अकाउंटवर 2 रुपये जमा केले. पैसे जमा झाले का बघा असे सांगितले. त्यानुसार दीप्ती यांनी पैसे जमा झाले असे सांगितले. दीप्ती यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने अॅबॅकची जेवढी रक्कम भरायची होती, तेवढी रक्कम असलेला मेसेज व लिंक टाकली. मेसेज गेल्यानंतर संशयित व्यक्तीने पुन्हा फोन केला. तुम्हाला मेसेज गेला आहे. तुमची रक्कम पहा आणि लिंकवर क्लिक केल्यानंतर पासवर्ड टाकायला सांगितला. दीप्ती यांनी पासवर्ड टाकताच संशयिताने 79 हजार 240 रुपयांची रक्कम ऑनलाईन स्वतःच्या खात्यात जमा केली.
आपल्या खात्यातून 79 हजाराची रक्कम गेल्यानंतर दीप्ती या घाबरुन गेल्या. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी प्रवीण कुमार (पूर्ण नाव माहित नाही) याच्याविरोधात भादविकलम 420 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (क), (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.





























































