T20 World Cup – इभ्रत राखण्यासाठी आज विजय हवा; हिंदुस्थानची लढत अफगाणिस्तानशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तान व न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्याने टीम इंडियाची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील वाटचाल खडतर बनली आहे. फलंदाजीत घोर निराशा आणि गोलंदाजीत अपयशी ठरलेल्या फ्लॉप हिंदुस्थानी संघापुढे उद्या बुधवारी झुंजार वृत्तीच्या अफगाणिस्तानचे कडवे आव्हान असेल. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला उद्या हिंदुस्थानच्या अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

 रोहित, राहुल सूर मिळविण्यासाठी आतूर

रोहित शर्मा व लोकेश राहुल या जागतिक कीर्तीच्या फलंदाजांना यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे हे दोन महान फलंदाज फॉर्मात येण्यासाठी आतुर झालेले असतील. कर्णधार विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांडय़ा असे कागदावर मोठे फलंदाज असलेले खेळाडू उद्या प्रत्यक्ष मैदानावर काय करतात हे बघावे लागेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी ही वेगवान जोडगोळी अपयशी ठरली. शार्दुल ठाकूरलाही छाप सोडता आली नाही की वरुण चक्रवर्तीच्या फिरकीची जादूही बघायला मिळाली. ‘टीम इंडिया’ला झालं तरी काय? हा मोठा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. जर-तरच्या समीकरणानुसार उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्याच्या टीम इंडियाला उद्या मोठा विजय मिळविण्यासाठी मैदानावर सर्वच स्तरावर चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

अफगाणिस्तानची लक्षवेधी कामगिरी

गुप-2 मधील सुपर-12 फेरीत स्कॉटलंड व नामिबिया या संघांना हरविणाऱया अफगाणिस्तानने पाकिस्तानचाही चांगलाच घामटा काढला होता. मात्र आसिफ अलीने अखेरच्या षटकात 4 षटकार ठोकून अफगाणिस्तानच्या घशापर्यंत गेलेला विजय हिरावून घेतला. त्यामुळे अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या विराट कोहलीच्या सेनेपुढे फॉर्मात असलेल्या अफगाणिस्तानचा संघ नक्कीच जोरदार टक्कर देऊ शकतो. आयपीएलमधील अनुभवाच्या जोमावर कर्णधार मोहम्मद नबी व फिरकीपटू राशिद खान यांनी अफगाणिस्तानच्या संघाची मोर्चेबांधणी केलेली आहे. हामिद शर्मा व नवीनुल हक ही गोलंदाजीची जोडी नव्या चेंडूवर करामत करण्यासाठी उत्सुक असेल.

आजच्या लढती  

न्यूझीलंड वि. स्कॉटलंड

गट 2 – दुबई, दुपारी 3ः30 वाजता

अफगाणिस्तान वि. हिंदुस्थान

गट 2 – अबुधाबी, रात्री 7ः30 वाजता