
ओव्हलच्या मैदानावर यजमान इंग्लंडचा दारुण पराभव केल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मॅनचेस्टरकडे रवाना झाला. मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर उभय संघांमध्ये पाचवा आणि अंतिम कसोटी सामना खेळला जाणार आहे. ओव्हलच्या मैदानावर 50 वर्षानंतर विजयी झेंडा फडकावलेल्या विराटसेनेवर ओल्ड ट्रॅफर्डमध्ये इतिहास रचण्याची संधी आहे. 10 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या कसोटी लढतीवर क्रीडाप्रेमींचे लक्ष असणार आहे.
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानचा संघ सध्या 2-1 असा आघाडीवर आहे. पाचवा सामना मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. मात्र या मैदानावरील हिंदुस्थानची कामगिरी खराब आहे. हिंदुस्थानने गेल्या 85 वर्षांमध्ये येथे 9 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र यातील एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. चार लढतींमध्ये हिंदुस्थानला पराभव सहन करावा लागला असून पाच लढती अनिर्णित राहिल्या आहेत.
यजमान इंग्लंडच्या बाबत बोलायचे झाल्यास त्यांनी या मैदानावर एकूण 81 कसोटी लढती खेळल्या आहेत. यात इंग्लंडच्या संघाने 31 कसोटीत विजय मिळवला, तर 15 कसोटीत त्यांना पराभव सहन करावा लागला. 35 लढती अनिर्णित राहिल्या.
क्यो हिला डाला ना! धोनी टीम इंडियाचा मेण्टॉर, दिग्गज खेळाडूनं केलं रजनीकांत स्टाईल स्वागत
2014 मध्ये दारुण पराभव
हिंदुस्थानने ओल्ड ट्रॅफर्डमध्ये आपला अखेरचा कसोटी सामना 2014 मध्ये खेळला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या लढतीत हिंदुस्थानला इंग्लंडकडून एक डाव आणि 54 धावांनी पराभूत व्हावे लागले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेला हिंदुस्थानचा संघ पहिल्या डावात 152 धावांमध्ये गारद झाला होता. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने पहिल्या डावत 367 धावा केल्या. यानंतर हिंदुस्थानचा दुसरा डाव 162 धावांमध्ये गुंडाळत डावाने विजय मिळवला होता.
हिंदुस्थान-इंग्लंड पुन्हा भिडणार, पुढल्या वर्षी वन डे व टी-20 मालिकेचे आयोजन
ओल्ड ट्रॅफर्डमधील हिंदुस्थानचा रेकॉर्ड
1936 – सामना अनिर्णित राहिला
1946 – सामना अनिर्णित राहिला
1952 – इंग्लंडचा एक डाव आणि 207 धावांनी विजय
1959 – इंग्लंडचा 171 धावांनी विजय
1971 – सामना अनिर्णित राहिला
1974 – इंग्लंडचा 113 धावांनी विजय
1982 – सामना अनिर्णित राहिला
1990 – सामना अनिर्णित राहिला
2014 – इंग्लंडचा एक डाव आणि 54 धावांनी विजय




























































