
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कामाला लावल्यानंतर महसूलचे अख्खे प्रशासन थेट फिल्डवर पाठविले. सोमवारी महसूल कर्मचाऱ्यांची २० पथके बीड जिल्ह्यात धडकली. या जिल्ह्यातील चारा छावण्या, टँकर पुरवठा यासह दुष्काळ निवारणाच्या कामाची या पथकांनी पाहणी केली. उद्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत या संदर्भात चर्चा होणार आहे.
दुष्काळ मराठवाड्याचा घोट घेण्याच्या तयारीत असल्याने या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वत: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर दुष्काळी भागात दौरे करून लक्ष ठेवून आहेत. गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक घेऊन त्यांची कानउघडणी केली होती. बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी हे अधिकारी कामाला लागले होते. गावा-गावात टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी पॉइंट वाढविण्यासोबत दुष्काळ निवारणार्थ सुरू असलेल्या कामे काटेकोर आणि गतीने सुरू झाली आहेत. या बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठवड्यातून तीन दिवस जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दुष्काळी भागात प्रत्यक्ष पाहणी दौरे करुन पाणीपुरवठा आणि रोजगार देणाऱ्या कामावर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. या पाठोपाठ आता विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्तांनाही प्रत्यक्ष दुष्काळी भागाचे दौरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांनाही थेट फिल्डवर पाठविण्यात येत असून, त्यांची २० पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
या पथकात अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, महसूल उपायुक्त विजयकुमार फड, सामान्य प्रशासन उपायुक्त वर्षा ठावूâर, रोहयो उपायुक्त पुरुषोत्तम पाटोदेकर, आस्थापना उपायुक्त पारस बोथरा, पुनर्वसन उपायुक्त प्रकाश खपले, नियोजन विभागाचे उपायुक्त रवी जगताप, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, प्रादेशिक पशुसंर्वधन सहआयुक्त सुनील राऊतमारे, विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह कदम, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी वर्षाराणी भोसले, उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे, स्वप्निल मोरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. एस. कांबळे, कृषी विभागाचे अधीक्षक साहेबराव दिवेगावकर, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक तुकाराम मोटे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भिकमसिंग राजपूत या अधिकाऱ्यांचा समावेश होता. आज सोमवारी २० पथके बीड जिल्ह्यात धडकली. सध्या या भागात मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या सुरू आहेत. या छावण्यांमध्ये जनावरांना वेळेत आणि ठरवून दिलेल्या प्रमाणात चारा दिला जातो िंकवा नाही, पाण्याची व्यवस्था चोख आहे किंवा नाही यासह दुष्काळ निवारणार्थ सुरू असलेल्या कामांची या पथकांनी पाहणी केली. या पाहणीत नेमक्या काय त्रुट्या आढळल्या, संबंधित अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा दिसून आला का, याची माहिती उद्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत या पथकाकडून दिली जाणार आहे.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर स्वत: मराठवाड्यातील अनेक गावांना भेटी देऊन पाहणी करीत आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस दौरे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यापाठोपाठ आता उपायुक्तांच्या पथकांचे दौरे सुरू झाले असल्याने अख्खे प्रशासन दुष्काळ निवारणाच्या कामासाठी लागले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची दुष्काळामुळे होणारी होरपळ थांबणार आहे.































































