
लॉकडाऊन काळात मोफत वाटप केलेल्या धान्याचे बिल देण्यासाठी संबंधिताकडून 6 हजार 693 रुपयाची लाच एजंटामार्फत स्विकारणाऱ्या कळंब तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार परविन उमर दराज खान पठाण यांना धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार स्वस्त धान्य दुकानदार असून तक्रारदारांनी लॉकडाऊनच्या काळात मोफत धान्य वाटप केले होते. त्याचे प्रत्येकी एक क्विंटल मागे 150 रुपये प्रमाणे शासनाकडून बिल मिळते. तक्रारदारांचे मागील तीन महिन्याचे 44 हजार 623 रुपये बिल काढून देण्यासाठी कळंब तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागातील नायब तहसिलदार परविन उमर दराज खान पठाण (47) यांनी श्रीरंग साधू डोंगरे (64, स्वस्त धान्य दुकानदार व अधक्ष्य, रास्त भाव धान्य दुकानदार संघटना कळंब), विलास ज्ञानोबा पिंगळे (55, स्वस्त धान्य दुकानदार, पाथर्डी, ता. कळंब) यांच्या मार्फत तक्रारदारांना बिलाच्या रक्कमेचे पंधरा टक्के म्हणजे 6 हजार 693 रुपये लाचेची मागणी करून डोंगरे यांच्या मार्फतीने पंचांसमक्ष स्वीकारले. त्यांना धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले असून याबाबत कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.


























































