
जदयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय खेळी खेळली आहे. ऑगस्टमध्ये भाजपसोबत युती तुटल्यापासून नितीश कुमार ‘आर-पार’च्या भूमिकेत आहेत. आता त्यांनी भाजपला शह देण्यासाठी आपला उत्तराधिकारी कोण असेल याचेही स्पष्ट संकेत दिले आहेत.
मंगळवारी विधानसभेच्या हिवाळी अधिकवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या बैठकीत नितीश कुमार यांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्याचे जाहीर केले. 2025 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक तेजस्वी यादव यांच्याच नेतृत्वात लढली जाईल. याचा अर्थ तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि नितीश कुमार यांचे उत्तराधिकारी असतील हे स्पष्ट होत आहे.
मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नसून मुख्यमंत्रीपदाचाही चेहरा नाही. भाजपचा पराभव हेच माझे लक्ष्य आहे, असे नितीश कुमार म्हणाले. तेजस्वी यादव यांना आता पुढे करायचे असून बिहारमध्ये 2025मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव हे आपले नेते असतील, असेही ते म्हणाले. ‘एनडीटीव्ही’ने याबाबत वृत्त दिले आहे.
ऑगस्टमध्ये काडीमोड
दरम्यान, याच वर्षई ऑगस्ट महिन्यात बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला होता. जदयूने भाजपपासून काडीमोड घेत राजद, काँग्रेस आणि इतर पक्षांना हाताशी धरून सरकार स्थापन केले. तसेच त्यांनी जयदूने एनडीएतूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

























































