“देवळात असेपर्यंत आपणांस कोणी नमस्कार करू नये व आपली पूजाही करू नये!”

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निळकंठ कुलकर्णी ([email protected])

।। श्री गुरुदेव दत्त ।।

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

कुरवपूर येथील चातुर्मास्यात श्री गांडामहाराजांप्रमाणेच श्री. शंकरराव देशमुख व त्यांच्या भगिनी काशीबाई वगैरे मंडळी श्री स्वामी महाराजांच्या बरोबर होती. त्या सर्वांना श्री स्वामी महाराजांनी अशी ताकीद देऊन ठेवली होती की, “आपण देवळात असेपर्यंत आपणांस कोणी नमस्कार करू नये व आपली पूजाही करू नये!”

एके दिवशी श्रीस्वामी महाराज भिक्षा घेऊन आले. त्या वेळी सर्व मंडळीची पाने वाढायची राहिली होती. सर्व मंडळींबरोबर महाराज भिक्षाग्रहण करीत असत. म्हणून त्यांनी भिक्षेची झोळी बाजूला ठेवून दिली. सर्वांची पाने वाढून जेवायची सिद्धता झाल्यावर श्रीस्वामी महाराज आपली झोळी घेऊन आले. अन्न बाहेर काढण्यासाठी झोळीत हात घातला. तेवढ्यात त्यांना एक काळा विंचू त्वेषाने चावला.

त्या क्षणी त्यांनी हात बारे जोरात झटकला. त्यांना विंचवाच्या विषाच्या असह्य वेदना होऊ लागल्या. ही शिक्षा देवांनी आपल्याला का केली? हे श्रीस्वामी महाराज ताबडतोब लक्षात आले. श्रीस्वामी महाराजांनी भिक्षेला जाण्यापूर्वीच सर्वांना जेवणे करून घ्या, असे सांगितले होते. पण सर्व मंडळी म्हणाली, “आपण भिक्षा केल्याशिवाय आम्ही जेवायला बसणार नाही!” अतिशय आग्रह झाल्यामुळे श्रीस्वामी महाराज नित्यपाठाची जी स्तोत्रे म्हणत असत. त्यांतील म्हणायचे एक स्तोत्र गडबडीत राहून गेले होते. ते लक्षात आल्यावर त्यांनी ते स्तोत्र म्हटले व सर्वांबरोबर ते भिक्षा ग्रहण करण्यास बसले. त्या दिवशी वेदनांनी बधिर झालेल्या हातानेच त्यांना भिक्षाग्रहण करावी लागली.

सर्वांची जेवण झाल्यावर सर्व मंडळी एकत्र जमली. तेव्हा लोकांनी विचारले “महाराज! आपण विंचवाला काही केलेल नसताना तो आपल्याला का चावला?” तेव्हा श्रीस्वामी महाराज म्हणाले “आज भिक्षेला जाण्यापूर्वी श्री लक्ष्मणराव उमरेडकर यांना एक यंत्र तयार करून देण्याच्या गडबडीत नित्यपाठचे एक स्तोत्र म्हणायचे राहून गेले. त्यामुळे देवांनी ही शिक्षा केली!

नंतर सर्वांना उद्देशून ते म्हणाले, “आमच्याकडून इतकीशी चूक झाली तर आम्हाला ही शिक्षा! अशी जर आमची स्थिती आहे. तर मग तुम्ही देवांची कितीतरी कृत्ये विसरता त्यासाठी देव तुम्हाला किती शिक्षा करतील, याचा विचार करा देवांच्या सेवेत कधीही कुचराई करू नये!” असा मोलाचा संदेश त्यांनी सर्वांना दिला.