उजनीची जलवाहिनी फुटली, 60 फुटांचे कारंजे; लाखो लिटर पाण्याची नासाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उजनी धरणाच्या यशवंतसागर जलाशयातून धाराशिव शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आज सकाळी फुटली. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे तब्बल 50 ते 60 फूट उंच कारंजे उडत होते. या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. तब्बल दोन तास पाण्याचे कारंजे उडत होते. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. कारंजे बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गळतीमुळे धाराशिव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

धाराशिव शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी धरणाच्या यशवंतसागर या जलाशयापासून धाराशिव शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी टेंभुर्णी शहरातून कुर्डुवाडी रस्त्याकडे जमिनीखालून नेण्यात आली आहे. सध्या टेंभुर्णी शहरात रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना पोकलॅनमुळे या जलवाहिनीचा व्हॉल्व उसकटला. त्यामुळे जलवाहिनीला प्रचंड गळती लागली. पाण्याचे 50 ते 60 फूट उंच कारंजे उडत होते. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

पाण्याच्या प्रचंड वेगामुळे सदरची जलवाहिनी सोलापूर महापालिकेची आहे की धाराशिव शहराला पाणीपुरवठा करणारी आहे, हे पाहणे मुश्कील झाले होते. दरम्यान, टेंभुर्णी शहरात जलवाहिनीला गळती लागल्याचे समजताच भीमानगर येथून सोलापूर आणि धाराशिव या दोन्ही जलवाहिन्यांचे विद्युत पंप बंद करण्यात आले. त्यानंतर सुमारे दोन तासांनंतर पाणी गळती थांबल्यानंतर ही जलवाहिनी धाराशिव शहराला पाणीपुरवठा करणारी असल्याचे समजले. जलवाहिनी फुटल्याने आणि पाण्याचे कारंजे पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. जलवाहिनी फुटल्यामुळे धाराशिव शहराला पाणी संकटाचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, सायंकाळपर्यंत जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम चालू झाले नव्हते.