
सामना प्रतिनिधी । परभणी
सेलू तालुक्यातील वालूर येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून दुचाकी वाहनावरुन पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याऱ्या लखन वाटुरे यास दोषी ठरवत दहा वर्ष सश्रम कारावास व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमुर्ती डी.व्ही. कश्यप यांनी सुनावली आहे.
सेलू पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्यावरुन मनोहर वाटुरे यांनी तक्रार दाखल केल्यावरुन लखन वाटुरे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. १० ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तक्रादाराची नात घरी आली नाही. म्हणून तक्रार दाखल करण्यात आली होती. वालूर येथीलच लखन वाटुरे याने या अल्पवयीन मुलीस दुचाकी वाहनावर बसवून सेलू येथे आला आणि रेल्वेने संभाजीनगर येथे नेले. यामुलीस आमिष दाखवून पळविले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. अशा आशयाची तक्रार दाखल केल्यावरुन सेलू पोलीस ठाण्यात लैगिंक अपराध बालकाच संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास तपासीक अंमलदार पोलीस उपनिरीक्षक एस.जी. पांढरे यांनी करून सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने तब्बल १२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐवूâन न्यायालयाने आरोपी लखन वाटुरे यास दोषी ठरवत १० वर्ष सश्रम कारावास व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष सत्र न्यायाधीश-३ चे डि.व्ही. कश्यप यांनी सुनावली. या प्रकरणी जिल्हा सरकारी वकील अॅड. दीपक गांजापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी वकील मुरलीधर मंत्री यांनी बाजू मांडली. या निकालाकडे सेलू तालुक्याचे लक्ष लागले होते.
































































