शिक्षक भरतीच्या टेट परीक्षेसाठी 2 लाख 39 हजार उमेदवारांची नोंदणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सरकारी अनुदानित शाळांमध्ये होणाऱया शिक्षक भरतीसाठी तब्बल 2 लाख 39 हजार 726 उमेदवार इच्छुक असून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी (टेट) या उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक नोंदणी ग्रामीण भागातील उमेदवारांनी केली आहे.

राज्यात 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत टेट परीक्षा होणार आहे. मार्चच्या दुसऱया आठवडय़ात या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. मागील काही वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात शिक्षक निवृत्त झाले असून जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये ही शिक्षकांची पदे रिक्त राहिले आहेत. त्यामुळे ती पदे भरण्यासाठी टेट परीक्षेचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदे भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने टेट ही परीक्षा घेण्यासाठी आयबीपीएस या खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीच्या माध्यमातूनच ही परीक्षा घेतली जाणार आहे, मात्र परीक्षेच्या अर्ज नोंदणी प्रक्रियादरम्यान असंख्य विद्यार्थ्यांना अडचणी आल्या होत्या. त्या अडचणी सोडवल्या गेल्या नसल्याने या कंपनीच्या एकूणच कामकाजावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिक्षकांची रिक्त पदे

सन 2019-20 च्या संच मान्यतेनुसार प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची सुमारे 37 हजार 84 पदे रिक्त आहेत तर शिक्षकेतर कर्मचारी यांची 2 हजार 644 पदे रिक्त आहेत. यामध्ये शालेय शिक्षण विभागाकडून कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर जिह्यांत एकूण 1 हजार 814 पदे आहेत.
n राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 37 हजार 84 पदे रिक्त असून या रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे लवकरच भरली जाणार आहेत.
n जे उमेदवार डीएड, बीएड तसेच टीईटीसारख्या इतर पात्रताधारक आहेत, अशा उमेदवारांची टेट परीक्षेच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.