
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा रविवार, १५ जुलै रोजी होणार आहे. राज्यभरातील १ लाख ३५ हजार २१० परीक्षार्थी ही परीक्षा देणार असून एकूण ५०९ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. दरम्यान, परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला एक मिनिट जरी उशीर झाला तरी परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या सर्व प्रकारच्या शाळांमध्ये शिक्षकपदी नियुक्तीसाठी प्रथम टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पहिली ते पाचवीसाठी टीईटी पेपर १ सकाळी १०.३० ते दुपारी १ तर सहावी ते आठवीसाठी पेपर २ दुपारी २ ते सायंकाळी ४.३० या वेळेत होणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली.
– पहिली ते पाचवीच्या पेपर १ साठी ५७ हजार ३६७ तर सहावी ते आठवीच्या पेपर २ साठी ३९ हजार २१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
– पेपर २ आणि पेपर २ या दोन्ही परीक्षांना ३८ हजार ६३० परीक्षार्थी बसणार आहेत.
– ही परीक्षा मराठीसह इंग्रजी, उर्दू, बंगाली, हिंदी, कन्नड, तेलगू, गुजराती, सिंधी या माध्यमातून पार पडणार आहे. प्रत्येक जिह्याच्या मुख्यालयात ही परीक्षा होणार आहे.


























































