
कळव्यात रिक्षावर झाड पडून रिक्षाचालक जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच वर्तकनगर येथे नारळाचे झाड घरावर पडून तीन जण जखमी झाले आहेत, यात तिघांच्याही डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना खासगी क्लिनिकमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
वर्तकनगर येथील पोखरण रोड क्रमांक 1, विजयनगरीमधील प्यारेलाल यादव चाळीतील रूम नंबर 6 वर बुधवारी रात्री नारळाचे झाड पडले. यामध्ये विनोद जैस्वाल (44) आणि पूजा जैस्वाल (22) व आदित्य चव्हाण (9) हे तिघे जखमी झाले असून विनोद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना चार टाके पडले आहेत. तर दोघांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. याची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत घरांच्या छताचे नुकसान झाले असून झाड हटवण्याची कारवाई तातडीने हाती घेण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिकारी संतोष कदम यांनी दिली.




























































