
पर्यटनासाठी निसर्गरम्य सिक्कीममध्ये गेलेल्या ठाण्यातील पुनमिया कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. कारने प्रवास करणाऱया पर्यटकांची गाडी खोल दरीत कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. पुनमिया हे सोन्या-चांदीचे व्यापारी असून पाच जणांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
टेंभी नाक्यावरील ओशो महावीर या इमारतीमध्ये राहणारे सुरेश पुनमिया (40), तोरल पुनमिया (30), हिरल पुनमिया (14), देवांशी पुनमिया (10), जयंत परमार हे उन्हाळी सुट्टीसाठी सिक्कीम येथे गेले होते.
त्यांच्यासोबत ठाण्यातील 18 जणांचा ग्रुपही होता. शनिवारी रात्री सर्व जण हॉटेलमध्ये परतणार होते. कारने प्रवास करीत असताना नॉर्थ सिक्कीममधील खेडुगजवळ रात्री 9च्या सुमारास गाडी येताच ती खोल दरीत कोसळली.
हेलिकॉप्टरची मदत
या भीषण अपघातात चालकासह ठाण्यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. एकूण तीन गाडय़ा हॉटेलच्या दिशेने परतत होत्या, पण सुरेश पुनमिया यांची गाडी न आल्याने त्यांच्या सहकाऱयांनी मोबाईलवर संपर्क साधून ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर लष्कराला कळवण्यात आले. आज सकाळी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोधकार्य करत असताना अपघातग्रस्त कार आढळून आली.
पुनमिया यांच्या जवळच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला असून उद्या सोमवारी सकाळी पाचही जणांचे मृतदेह विमानाने ठाण्यात आणण्यात येणार आहेत.



























































