मुरबाडमध्ये एसटीची स्कॉर्पिओला धडक; 4 जण ठार, दोन गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुरबाडमध्ये एसटीची स्कॉर्पिओला धडक बसल्याने अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून, दोन चिमुकली मुले थोडक्यात बचावली आहेत. मुरबाडच्या वैशाखरे गावाजवळ मंगळवारी सकाळी ही घटना घडली. या अपघातामुळे पंधरा दिवसांपूर्वी कल्याण मुरबाड मार्गावर झालेल्या भीषण अपघाताच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

मुरबाड माळशेज घाट रस्ता सिमेंट क्राँक्रीटचा गिळगुळीत रस्ता सध्या धोकादायक व मृत्यूचा सापळा बनला असून अपघाताची मालिका सुरू झाली आहे. याआआधी 13 एप्रिल रोजी 11 प्रवाशांचा बळी जाऊन महिना लोटला नाही तर आज माळशेज घाटात राष्ट्रीय महामार्गावरील वैशाखरे गावच्या हद्दीतील एका वळणावर सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास बस आणि स्कार्पिओची जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे. अपघातात आराध्या (12) आणि वेदांश (3) ही दोन भावंडे सुदैवाने बचावली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर एसटी कल्याणहून अहिल्यानगरकडे चालली होती तर स्कॉर्पिओ माळशेज घाटाकडून मुरबाडच्या दिशेने चालली होती. यादरम्यान सकाळी साडे अकराच्या दरम्यान तीव्र वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, स्कार्पिओमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच बसमधील प्रवाशांना कोणतीच दुखापत झाली नसून, बसचा इंजिनचा खालचा भाग तुटल्याने बस रस्त्याच्या बाहेर गेली.

अभिषेक मोहटे (45), अविनाश रामचंद्र काकडे, निता अशोक डुरे (48), मिना कल्याण मडके (47) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. हे सर्वजण नेवासा येथील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच टोकावडे पोलीस ठाण्याचे स.पो.नि.शितलकुमार नाईक हे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालय टोकावडे येथे दाखल केले.