15 प्रवासी असतील तरच बस निघणार

संचारबंदीत महामंडळाच्या बससेवेला सूट देण्यात आली असली, तरी प्रवाशी नसल्याने अनेक बसेस रिकाम्या धावत आहेत. यामुळे आर्थिक फटका बसत असल्याने आता किमान 15 प्रवासी असतील तेव्हाच बस मार्गस्थ होणार आहे. विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी या संदर्भात माहिती दिली.

कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने राज्यभरात 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत महामंडळाच्या बससेवेला सूट देण्यात आली आहे. असे असले तरी संचारबंदीमुळे राज्यभरात ‘बंद’ असल्याने प्रवासही बंद झाल्याने महामंडळाच्या बससेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे. महत्वाचे काम असणारेच प्रवाशी प्रवासासाठी घराबाहेर पडत असल्याने महामंडळाच्या अनेक बसेस रिकाम्या धावत आहेत. यामुळे मोठा अर्थिक फटका बसत असल्याने संभाजीनगर आगाराने अनेक बसेस आगारात उभ्या केल्या आहेत.

काही बसेस प्रवाशांच्या सेवेत असल्या तरी प्रवासी नसल्याने या बसेसही रिकाम्या धावत आहेत. डिझेल खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बस दुरुस्तीसह अन्य खर्च पाहता सध्या महामंडळाला मिळणारे उत्पन्न नगण्य आहे. त्यामुळे आता किमान 15 प्रवासी असले, तर बस मार्गस्थ होणार आहे. विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, संभाजीनगर विभागातील सर्व आगाराच्या बसेस दरदिवशी सव्वालाख कि.मी. प्रवास करतात. सध्या हे प्रमाण 25 हजार कि.मी. वर आले आहे. संचारबंदी असल्याने प्रवासी संख्या बोटावर मोजण्याइतकी असल्याने बसेस रिकाम्या धावत आहेत. यामळे दरदिवशी लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे आता किमान 15 प्रवासी असतील, तरच त्या मार्गावर बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या