
हिंदुस्थानचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याच्या कारवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यात पृथ्वीला कोणतीही इजा झालेली नाही. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव हे दोघे बुधवारी रात्री विलेपार्ले येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. तिथे जेवत असतानाच एकजण सेल्फी घेण्यासाठी पृथ्वीजवळ आला. त्यास पृथ्वीने सेल्फी घेऊ दिला. मात्र, त्यानंतर तो वारंवार सेल्फी घेऊ लागला. त्याच्यासोबत असलेल्या महिलेनेही सेल्फीसाठी पृथ्वीला त्रास दिला. याबाबत पृथ्वीने हॉटेलच्या मॅनेजरला सांगितले असता सेल्फी घेणाऱ्या या दोघांनाही हॉटेल व्यवस्थापनाने बाहेर काढले. त्याच रागातून नंतर पृथ्वीच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
पृथ्वी व त्याचा मित्र जेवून बाहेर आले असता त्यांना रोखून दोघांनी बेस बॉल बॅटने पृथ्वीच्या गाडीवर हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान ओळखत आशिषने पृथ्वीला अन्य गाडीत बसवून पाठवून दिले आणि नंतर आशिषही निघाला. त्याचदरम्यान, हल्लेखोरांनी त्यांच्या साथीदारांना बोलवून घेतले. चार बायकर्स तिथे दाखल झाले. या सर्वांनी आशिषच्या गाडीचा पाठलाग केला.
50 हजारांची मागणी
आशिषची गाडी जोगेश्वरीच्या लोटस येथील पेट्रोल पंपाजवळ थांबली असता पाठलाग करणाऱ्या गाडीतून सदर महिला उतरली. या महिलेने आशिषला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. प्रकरण मिटवायचे असल्याच 50 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी या महिलेने केली. याप्रकरणी आशिषने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत असून सना उर्फ सपना गिल या महिलेसह 5 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या सर्वांना उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे. हल्ला झाला तेव्हा हल्लेखोर नशेत होते, असेही समोर आले आहे. दरम्यान, पृथ्वी शॉ याला बदनाम करण्याच्या इराद्याने हे कृत्य केले गेले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


























































