
महिला आयपीएलचे सर्व सामने मुंबईतच खेळविण्याची शक्यता असून येत्या 4 ते 26 मार्चदरम्यान ही स्पर्धा मुंबईच्या ब्रेबॉर्न आणि डी.वाय.पाटील स्टेडियमवर खेळविली जाण्याची शक्यता बीसीसीआयच्या सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येईल. या आयपीएलमध्ये पहिल्या तीन वर्षात पाच संघ खेळणार असून पुढील दोन वर्षात महिला संघांचा आकडा सहा संघांपर्यंत पोहोचेल. आयपीएलच्या ब्लॉकबस्टर यशानंतर तब्बल 15 वर्षांनी महिला आयपीएल सुरू करण्यात बीसीसीआयला यश लाभणार आहे. या लीगचे प्रसारण हक्क वायकॉम 18 ने तब्बल 951 कोटींना खरेदी केले आहेत. त्यामुळे महिला आयपीएलची जोरदार तयारी सुरू झाली असून स्पर्धेचा मुहूर्त आयपीएलच्या आधीच साधला जाणार असल्याचे कळले आहे.




























































