अंधेरीचा राजा साकारणार; सारंगपूरच्या श्री कष्टभंजन हनुमान मंदिराचा देखावा, 32 फूट उंच मूर्ती ठरणार आकर्षण

मुंबईकरांच्या मनामनात श्रद्धेचे स्थान मिळवलेल्या अंधेरीच्या राजाचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या वर्षी हीरकमहोत्सवात पदार्पण करणार आहे. त्या निमित्ताने सारंगपूरच्या श्री कष्टभंजन हनुमान मंदिराचा देखावा साकारण्यात येणार असून बाप्पाची सुमारे 32 फुटी मूर्ती प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

अंधेरीचा राजा मंडळाचा हीरकमहोत्सव असल्यामुळे या वर्षी गणेशोत्सव मोठय़ा जल्लोषात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. या वर्षी मूर्तीचे मानकरी जयेश आणि विजय वाघेला हे आहेत. या ऐतिहासिक वर्षाची सुरुवात गणेश पूजन आणि मंडपाच्या विधिवत कामाने करण्यात आली. यावेळी मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक यशोधर फणसे, अध्यक्ष अशोक राणे, कार्याध्यक्ष महेंद्र धाडिया, सचिव विजय सावंत, खजिनदार सुबोध चिटणीस, उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, रवींद्र पोवळे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

हीरकमहोत्सवानिमित्त अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. आरोग्य शिबिरात रक्तदान, आरोग्य तपासणी, डोळे तपासणी, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य मोहीम राबवण्यात येणार आहे तसेच वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती, शैक्षणिक मदत व पुस्तके वाटप, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण साहित्य आणि शिष्यवृत्ती योजना असे अनेक समाजोपयोगी उपक्रम
राबवले जाणार आहेत.