सर्वाधिक केसेस असलेले नेते भाजपमध्ये आहेत, नवाब मलिक यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या राजकीय लोकांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यामध्ये सर्वाधिक केसेस असणारे नेते भाजपचे आहेत असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे. राज्यसरकार गुंड व पोलिसांच्या जीवावर चालते असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला असून त्याला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

मोदीजी व अमित शहाजी हे ज्यापध्दतीने गुजरातमध्ये सरकार चालवत होते. त्यांच्या सरकारमध्ये पुरुषोत्तम सोलंकी नावाचा दाऊदचा हस्तक होता त्याला मंत्री केले होते. ज्यांच्यावर टाडा लावला होता त्यांना मोदींजी मंत्री करत होते आणि आजही मोदींच्या कॅबिनेटमध्ये असे लोक आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. भाजपशासित राज्यातही ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत असेही लोक आहेत याची आठवणही नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना करुन दिली आहे.

राजकीय लोकांवर सूडभावनेने कारवाई

सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत असेल तर याचा अर्थ राजकीय लोकांवर सूडभावनेने कारवाई होत होती हे सत्य आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ईडी व सीबीआय यांचा देशातील तपास ज्यापध्दतीने सुरू आहे त्यावर सुप्रीम कोर्टाने एकप्रकारे शंका निर्माण केली आहे. सुप्रीम कोर्टाने या दोन्ही एजन्सींना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते मात्र त्यांनी याद्या देऊन त्यांचं काम पूर्ण झालं अशी भूमिका घेतली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

ईडी व सीबीआयकडे राजकीय व इतर किती केसेस प्रलंबित आहेत याची माहिती सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. याचाच अर्थ ईडी व सीबीआय या एजन्सींच्या कारवाईवर शंका उपस्थित होते आहे. खडसे यांची संपत्ती जप्त करण्यात आली तर काहींना वारंवार बोलावून त्रास दिला जातोय अशा प्रकारे राजकीय दबावाने काम सुरू असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.