
मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरातून सणासुदीला आणि दररोज असंख्य एसटी व खासगी बसेस मुंबईच्या बाहेर रवाना होतात; पण यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण होते. त्यामुळे महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएमआरडीच्या जागा घेऊन प्रवासी बसेससाठी थांबे बांधण्याची सूचना शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जागा मिळाल्यास महामंडळाच्या वतीने थांबे बांधण्यात येतील असे आश्वासन दिले.
एसटी महामंडळाच्या प्रश्नावरील चर्चेत भाग घेताना सुनील प्रभू यांनी प्रवासी बसेसमुळे महामार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीकडे परिवहन विभागाचे लक्ष वेधले. पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावर या बसेसना थांबण्यासाठी काही ठराविक ठिकाणी थांब्याची व्यवस्था केली तर महामार्गावरील वाहतूककोंडी दूर होईल. त्याची योजना तयार केली तर मुंबईच्या महामार्गावर वाहतूककोंडी दूर होईल आणि प्रवाशांना दिलासा मिळेल. कोकणात जाणाऱ्या जागेसाठी पीडब्ल्यूडी एमएमआरडीएशी पत्रव्यवहार दहिसर चेकनाक्यावर अनेक लोकप्रतिनिधींनी आमदार निधीतून एसटीसाठी स्टँड तयार केले आहेत; पण हे स्टैंड रस्त्यावरच असल्याने वाहतूककोंडी होते. मुंबईत जागा मुख्य रस्त्यावर नाही. पण सुनील प्रभू यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएमआरडीशी पत्रव्यवहार केला जाईल. त्यांनी जागा दिली तर महामंडळाच्या खर्चाने बसेससाठी थांबे बांधण्यात येतील, असे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी यावेळी दिले.
गाड्या दहिसरमधून जातात. तिथे सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा आहे. एमएमआरडीएची जागा आहे. ती जागा एसटी महामंडळासाठी मिळवून घेतली आणि त्या ठिकाणी या बसेस उभ्या केल्या तर महामार्गावरील वाहतूककोंडी दूर होईल. यासाठी परिवहन विभागाने प्रयत्न करावेत, अशी सूचना सुनील प्रभू यांनी केली.
कोकणासाठी जादा बसेस सोडणार
कोकणात गणपती व शिमगा हे दोन मोठे सण आहेत. या सणांसाठी मोठ्या प्रमाणावर खासगी बसेस सुटतात. आता गणपती उत्सव येत आहे, पण जादा भाडे घेऊन भाविकांची व कोकणवासीयांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी वेळीच दखल घेण्याची मागणी शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी केली. त्यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाने ८ हजार ३०० बसेस घेतल्या आहेत. गुहागर मतदारसंघातील एसटी आगारांना नवीन बसेस दिलेल्या आहेत. तुम्ही बसेस मागून थकाल पण मी बस देऊन थकणार नाही अशी व्यवस्था केली आहे. खासगी बसवर नियंत्रण आणण्याचे काम भविष्यात आम्हाला करावे लागेल. ज्या ठिकाणी एसटी बसेसची गरज असेल त्या ठिकाणी मागणी करा. तुमची जादा बसेसची मागणी गणपतीच्या पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिली.






























































