
सामना ऑनलाईन, अलिबाग/ पेण
सरत्या वर्षाला निरोप देतानाच ‘उगवत्या’ वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटकांनी रायगड जिह्यातील समुद्रकिनारे गाठले आहेत. शनिवार, रविवारची जोडून सुट्टी असल्याने दोन दिवस अगोदरच मुंबई, ठाणे तसेच पुण्यातून आज अक्षरशः जथ्थेच रायगडच्या दिशेने निघाले. त्यामुळे अलिबाग, मुरुड-जंजिरा, काशिद, श्रीवर्धन, दिवेआगरचे समुद्रकिनारे फुलून गेले आहेत. मात्र पर्यटकांचे हे ‘वऱ्हाड’ एकाच वेळी रस्त्यावर उतरल्याने मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
पाच कि.मी.च्या रांगा
मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांच्या संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे या महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. पेणनजीक खारपाडा, जिते, तरणखोप, रामवाडी, वडखळ आदी ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या महामार्गावर काही ठिकाणी दुभाजक नसल्याने बेशिस्त वाहनचालक उलटय़ा दिशेने वाहने चालवत असल्याने दोन्ही बाजूकडील वाहने अडपून पडली होती. तब्बल पाच कि.मी. वाहनांच्या रांगा लागल्याने पाच मिनिटांच्या प्रवासाला तब्बल दोन-अडीच तास लागले. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
गेट वे-मांडवा जलवाहतूक हाऊसफुल्ल
अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारे हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागताला अलिबागमध्ये पर्यटक जलवाहतुकीने येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई गेट वे येथून जलवाहतुकीने पर्यटक मांडवा बंदरात येऊन तेथून बसने अलिबागकडे रवाना होत आहे. रस्ते मार्गापेक्षा जलवाहतूक प्रवास हा आरामदायी व सुखकारक आहे. मेरिटाइम बोर्डाने रोजच्या जलवाहतूक फेऱयाबरोबर अतिरिक्त 25 फेऱया वाढवल्या आहेत. तसेच पर्यटक हे खासगी बोटीनेही मांडवा बंदरात येत आहेत, अशी माहिती मांडवा बंदर निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे.
























































