ऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अर्धापूर

ऊसतोड कामगारांची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची दहा लाख रुपयांची बॅग धाब्यावर जेवायला थांबले असता चोरट्यांनी चारचाकी गाडीतून लंपास केली. विशेष म्हणजे मंगळवारी भरदिवसा चार वाजताच्या सुमारास नांदेड-नागपूर महामार्गावर भोकरफाटा परिसरातील एका धाब्यावर ही घटना घडली.

मुखेड तालुक्यातील झिरोगातांडा येथील प्रेमदास काशीराम राठोड व त्यांच्या दोन मित्रांनी नांदेड येथील युनियन बँकेतून दहा लाख रुपये रक्कम काढली व बॅगेत ठेवली. ही बॅग चारचाकीमध्ये घेऊन (क्र-एम.एच.26,एके,1662) ऊस तोड कामगारांची टोळी करण्यासाठी मालेगाव परिसरात आले होते. परंतु नातेवाईकाची भेट न झाल्यामुळे त्यांनी बारडकडे जाण्याचा निर्णय घेतला. नांदेड-नागपूर महामार्गावरील भोकरफाटा परिसरात आल्यानंतर स्वागत धाब्यावर ते जेवणासाठी थाबले. याच संधीचा फायदा घेत त्यांच्या गाडीची काच फोडून दहा लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. भोकरफाटा परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक निकाळजे व पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.