
राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे यांच्या कार्यालयातील 4 युपीएस चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सीआयडीमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारानेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. अनंत विश्वनाथ मोरे (वय 34, रा. विधाते वस्ती, बाणेर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत सीआयडीचे पोलीस हवालदार विजय साहेबराव सुळ (वय 46) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुळ गेल्या चार वर्षांपासून सीआयडीमध्ये हवालदार म्हणून नेमणुकीला आहेत. सोमवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक अनुजा देशमाने यांनी सीआयडीच्या नियंत्रण कक्षाला फोन करून विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे पश्चिम यांच्या कार्यालयातील युपीएस चोरीला गेल्याचे कळविले.
मिळालेल्या माहितीनुसार सीआयडीतील नियंत्रण कक्षात असलेल्या सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यावेळी सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या अनंत मोरे यानेच चार युपीएस चोरून नेल्याचे दिसून आले. युपीएस त्याने पार्किंगमधील बाथरूमध्ये लपविल्याचे आढळून आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, चतुःशृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.



























































