अधिकारी असल्याचे भासवून लुटले, सीसीटीव्हीमध्ये भामटे कैद

67

सामना प्रतिनिधी । कासार सिरसी

अधिकारी असल्याची बतावणी करून अंगठ्या व रोख रक्कम घेऊन एकास फसविल्याची घटना गुरुवार कासार सिरसी येथे घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

कासार शिरशी येथील विश्वनाथ नागप्‍पा रुकारे (68) हे रस्त्याने जात असताना दोन अज्ञात व्यक्ती मोटर सायकलवरून समोरून आले व “आम्ही मोठे अधिकारी आहोत हातात अंगठ्या घालतोस का? काढून दे म्हणून” दोन सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी दहा ग्रॅम )किंमत 50 हजार रुपये व खिशातून पैसे काढायला लावून रोख 1 हजार रुपये असा एकूण 51 हजार रुपयांचा ऐवज घेऊन फरार झाले. विश्वनाथ रूकारे यांच्या फिर्यादीवरून त्या दोन अज्ञात व्यक्तीं विरूध्द कलम 417,170, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे

दरम्यान, सदरील दोन्ही अज्ञात व्यक्ती ही घटना घडण्यापूर्वी दुपारी येथील सचिन ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानातही गेले होते. त्या दुकानातील सीसीटीव्ही मध्ये दोन्ही अज्ञात व्यक्तींचे छायाचित्र आले असून त्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. टी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गोरोबा घोरपडे व पो. कॉ. विकास भोंग हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या