बसमध्ये जेष्ठ महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या सराईताला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत जेष्ठ महिलांचे दागिने चोरणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 4 लाख 92 हजारांचे 10 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. संतोष शरणाप्पा जाधव (वय 36, रा. मुंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शहरातील विविध भागातून पीएमपीएल बसमध्ये प्रवास करताना महिलांच्या दागिन्यांच्या चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यापार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाकडून बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग करण्यात येत होती. त्यावेळी मुंढवा परिसरातील एका बसस्थानकात संशयित सातत्याने चढउतार करीत असल्याचे पोलीस हवालदार अजय गायकवाड आणि चेतन चव्हाण यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी संतोषला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने वानवडी, स्वारगेट, दत्तवाडी हद्दीतून जाणाऱ्या पीएमपीएल बसमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 4 लाख 92 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या सुचनेनूसार सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, संतोष तासगावकर, अजय गायकवाड, चेतन चव्हाण, दया शेगर, विशाल भिलारे, स्वाती गावडे यांच्या पथकाने केली.