असेही चोरटे…गल्ल्यात पैसे नसल्याने काजू बदामवर ताव मारत केला पोबारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरफोडी केल्यानंतर चोरटे रिकाम्या हाती परत जातील असे शक्य नाही. अशीच एक घटना शहरातील सॅलसबरी पार्क परिसरात घडली आहे. ड्रायफ्रुटच्या दुकानातील गल्ल्यात पैसे हाती न लागल्याने चोरट्यांनी तेथेच बसून काजू बदामवर ताव मारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भुकलेल्या चोरट्यांना पैशांऐवजी काजू बदाम आवडल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

सॅलसबरी पार्क परिसरात असलेल्या रोहन अपार्टमेंटमध्ये धवन बाबुलाल श्रीमाल यांच्या महावीर ड्राय फ्रुट्स शॉप चोरट्यांनी फोडले. दुकानात कोणताही महागडा ऐवज न मिळाल्याने चोरटयांनी बदाम व काजूवर ताव मारत 9 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सॅलसबरी पार्क परिसरात फईम नसीम मलिक (वय 23, रा. लुल्लानगर, कोंढवा) यांचे लॉरिस युनिसेक्स सलुन शॉप आहे. बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मलिक यांनी दुकान बंद केल्यानंतर अज्ञात चोरटयांनी शॉप उचकटून दोन मोबाईल, हेअर किंटग ट्रीमर असा हजार 24 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला.

गंगाधाम चौकात डॉ. संजय ओसवाल (वय 48, रा. मार्केटयार्ड) यांचे क्लनिक आहे. तक्रारदार बुधवारी सायंकाळी क्लिनीक बंद करून घरी गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरटयांनी क्लिनीकचे शटर उचकटून आत प्रवेश केला. क्लिनीकमधील लॅपटॉप, चांदीचे शिक्के, मूर्ती, रोख रक्कम असा एक लाख 50 हजार रूपयांचा ऐवज त्यांनी चोरून नेला. दुसऱ्या दिवशी क्लिनीकमध्ये आल्यानंतर डॉ. ओसवाल यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मार्केटयार्ड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत.