योगाभ्यासात हवं सातत्य

सोमवारी सुरू झालेले वर्ष हे हिंदुस्थानी कालगणनेप्रमाणे जरी नसले तरी सध्या संपूर्ण जगभरामध्ये याचेच प्रचलन आहे. ग्रेगोरियन कालगणनेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचे हे 2024 वे वर्ष. नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात केले जाते व याच उत्साहाच्या भरात अनेक नवीन संकल्प केले जातात. संकल्पपूर्तीच्या दृष्टीने प्रयत्नही सुरू होतात. तथापि ज्या उत्साहाच्या भरात संकल्प केले जातात तो उत्साह मात्र शेवटपर्यंत टिकत नाही आणि यातील बहुतांश संकल्प हे हवेत विरून जातात. पण म्हणून संकल्प करणे थांबत नाही आणि त्यांचे महत्त्वही संपत नाही.

असे म्हणतात की, ईश्वराच्या संकल्पातूनच सृष्टी उत्पन्न झाली. कुठल्याही नवीन गोष्टीचा, कार्याचा, संघटनाचा प्रारंभ हा एका संकल्पातूनच होतो. पण संकल्पपूर्तीसाठी लागणारी जिद्द ही मात्र फार कमी लोकांकडे असते. आपण सहज, साध्य, सोपे संकल्प करावेत आणि त्या दृष्टीने रोज प्रयत्न करावा. मानसशास्त्र सांगते की, कुठल्याही गोष्टीची सवय होण्यासाठी त्याचा सराव अर्थात अभ्यास हा कमीत कमी 21 दिवसपर्यंत करावा लागतो. 21 दिवसांत ती गोष्ट आपल्या अंगवळणी पडते.

योगाभ्यास करण्याचा संकल्प अनेक जण नववर्षाच्या प्रारंभी करतात आणि हा संकल्पमध्येच अर्धवट सोडला जातो. कल्प म्हणजे कल्पना. एखाद्या कल्पनेला प्रयत्नांची जोड देऊन ती कल्पना सत्यात उतरविण्याचा निर्धार करणे म्हणजेच संकल्प.

हा संकल्प केल्यानंतर त्या संकल्पाच्या पूर्तीच्या दृष्टीने आपण आपला प्रवास सुरू केला पाहिजे. आळस सोडला पाहिजे. आजचे काम किंवा संकल्प उद्यावर ढकलू नये आणि जो संकल्प आहे त्याचा ध्यास घेऊन निरंतर त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केला पाहिजे. अभ्यास म्हणजे पुनरावृत्ती, पुनरावर्तन (Repetition) त्यामुळे एखाद्या गोष्टीचा वारंवार अभ्यास केला पाहिजे.योगाभ्यासामध्ये यासाठी एक अतिशय सुंदर सूत्र आहे.

स तु दीर्घकाल नैर्यंतर्य सत्कारसेवितों दृद्धभूमिःघ्

अर्थात कुठल्याही गोष्टींमध्ये आपल्याला संकल्पित, अपेक्षित यश मिळवण्यासाठी ती गोष्ट दीर्घकाळपर्यंत केली पाहिजे. केवळ दीर्घकाळपर्यंत करून उपयोगाची नाही तर त्यामध्ये निरंतरता किंवा सातत्य पाहिजे आणि ती गोष्ट केवळ निरंतरता, दीर्घकाळ करूनही उपयोगाची नाही, तर त्यामागे आपली श्रद्धा पाहिजे. ती एका चिकाटीने, जिद्दीने आणि श्रद्धेने आपण केली पाहिजे तरच त्या गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळू शकते.

सीए.अभिजित कुलकर्णी
योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
www.bymyoga.in