मोटरसायकल चोरताना पकडल्याने हाणामारी, चारजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

मोटरसायकल चोरतांना रंगेहाथ पकडल्याच्या वादातुन झालेल्या तुंबळ हाणामारीत चौघे जखमी झाले आहेत. यावेळी पत्रकार भाऊसाहेब येवले यांना देखील मारहाण झाल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ राहुरी शहरातील गुरूवारी राहुरी शहरा बरोबरच आठवडे बाजार बंदची हाक विविध संघटनांनी दिली आहे.
आज बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शहरातील नवीपेठेत हाणामारीची ही घटना घडली.संजय मोटे यांची मोटरसायकल दुकान पासुन गायब झाल्याने या मोटरसायकलचा शोध सुरू असताना मोटरसायकल घेवुन जाणार्‍यास नवी पेठेत पकडल्याने हाणामारीस सुरवात झाली.यावेळी तरूणाचा मोठा जमाव घटनास्थळी दाखल झाल्याने तुंबळ हाणामारी झाली. तरूणाच्या या टोळक्याने केलेल्या हाणामारीत संजय मोटे, ऋषिकेश मोटे, प्रकाश चव्हाण सह एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीतील संजय मोटे व ऋषिकेश मोटे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी नगरच्या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
तरूणाचे टोळके चौघांना बेदम मारहाण करत असताना पेठेतील वातावरण तणावपूर्ण बनले होते. तब्बल तासभर हाणामारी सुरू होती.या घटनेतुन राहुरी शहरात बिहार स्टाईल गुंडागर्दी दिसुन आली. या हाणामारीच्या ठिकाणी मोठी गर्दी जमल्याने पेठेतील वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी पत्रकार भाऊसाहेब येवले घटनास्थळी गेले असता त्यांचाकडील मोबाईल हिसकावून त्यांना देखील मारहाण करण्यात आली.घटने नंतर शहरातील  नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते.या घटनेने राहुरी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिस प्रशासनाचा गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारे धाक नसल्याचे दिसून आले आहे.
राहुरी शहरात भिषण हाणामारी झाल्याने श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी राहुरी शहरात दाखल होत घटनेची माहिती घेतली. या घटने बाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेतील गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करावी या मागणीसाठी राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे तसेच राहुरी तालुक्यातील पत्रकारांनी पोलीस उपअधिक्षक राहुल मदने यांची भेट घेतली.