
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
मंगळवारी दिल्ली सचिवालयात माझ्यावर झालेला मिरचीपूड हल्ला हा राजकीय सूडभावनेतूनच करण्यात आला होता. आपचे यश भाजपला खुपतेय. माझ्यावर 2 वर्षांत चार वेळा भयानक हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमागे कुणाचा हात असेल ते तुम्हाला सांगायला नको. माझ्या पक्षाचे काम आणि यश त्यांच्या डोळ्यात सलत आहे म्हणूनच माझ्यावर वारंवार हल्ले घडवून आणले जात आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
माझ्यावरील कालचा मिरपूड हल्ल्याचा प्रयत्न हा किरकोळ प्रसंग समजू नका.ते लोक मला संपवू पाहत आहेत. आता माझ्यावरील कालच्या हल्ल्यातील हल्लेखोर पकडला गेलाय. लवकरच सत्य काय आहे ते आपल्याला कळेल ,असेही मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले. .
मिरपुडीच्या जागी ऍसिड असते तर -शिसोदिया
केजरीवाल यांच्यावरील कालचा हल्ला हा मोठ्या कटाचाच भाग वाटतो.थेट सचिवालयात एखादी व्यक्ती मिरपुडीसारखी धोकादायक वस्तू घेऊन पोचतोच कसा? असा सवाल करीत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी या प्रकारासाठी दिल्ली पोलीस आणि भाजपलाच जबाबदार ठरवले.ते म्हणाले, काळ हल्लेखोराकडे मिरपूड होती म्हणून ठीक, जर त्याऐवजी त्याच्याकडे ऍसिड अथवा पिस्तूल असते तर केवढा भयानक प्रसंग ओढवला असता याची कल्पनाच मनाला सहन होत नाही.

























































