अयोध्येत दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच अयोध्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चोरांचा सुळसुळाट रामनगरी परिसरात वाढल्याचे दिसून येत आहे. राम मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर लावलेले 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचे हजारो विजेचे दिवे गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अयोध्या विकास प्राधिकरणाने यश एंटरप्रायझेस आणि पृष्णा ऑटोमोबाईल्स या कंपन्यांना मंदिर मार्गांवर विद्युत रोषणाई करण्याच्या ठेका दिला होता. त्यानुसार मंदिराकडे जाणाऱ्या रामपथावरील झाडांवर 6,400 बांबू दिवे आणि भक्तीपथावर 96 गोबो प्रोजेक्टर दिवे लावले होते. त्यातील 3800 बांबू दिवे आणि 36 गोबो प्रोजेक्टर दिवे चोरीला गेल्याची तक्रार यश फर्मचे प्रतिनिधी शेखर शर्मा यांनी रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात दिली.
चोरी झाल्यानंतर दोन महिन्यांनी तक्रार
अयोध्येतील राम मंदिराकडे जाणाऱ्या महामार्गाची 9 मे रोजी पाहणी केल्यानंतर काही लाईट्स गायब असल्याचे आढळून आले होते. परंतु या कामाचा ठेका देण्यात आलेल्या कंपनीच्या प्रतिनिधीने 9 ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रात दाखल केली. चोरी दोन महिन्यांपूर्वी झालेली असताना तक्रार दाखल करण्यास उशीर का करण्यात आला? या प्रकरणात पुणाचा दबाव होता का? असा सवाल केला जात आहे.
अयोध्येतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
अयोध्येतील राम मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे, असे असतानाही प्रमुख मार्गावरील दिवे चोरीला गेल्याने अयोध्येतील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.