
वेडसरपणाचे झटके आल्याने संतप्त झालेल्या युवकाला शांत करत असताना गळा दाबला गेल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना विलेपार्लेच्या नेहरूनगर येथे घडली. राजेश कमरुद्दीन इंदोरवाला असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी सुमन कमरुद्दीन इंदोरवाला, दुर्गेश्वरी इंदोरवाला आणि कृष्णा ऊर्फ बिट्टी कश्यप या तीन महिलांना जुहू पोलिसांनी अटक केली. त्या तिघींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
राजेश हा जुहू येथील नेहरूनगर झोपडपट्टीत राहत होता. तो एका महाविद्यालयात शिपायाचे पूर्वी काम करायचा. गेल्या आठवडय़ात राजेश अचानक संतप्त होऊ लागला. तो संतप्त झाल्यावर स्वतःवर चाकू मारून घेत असायचा. तसेच पोटमाळय़ावरून उडी मारत असायचा. चार दिवसांपूर्वी राजेश हा अचानक संतप्त झाला. तो पोटमाळय़ावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला त्याची आई सुमन, बहीण दुर्गेश्वरी आणि मावशी कृष्णाने शांत करण्याचा प्रयत्न केला. राजेश अधिकच संतप्त होऊ लागल्याने त्याला शांत करण्यासाठी त्या तिघींनी त्याला बांधून ठेवले. शांत करत असतानाच गळा दाबला गेल्याने तो बेशुद्ध पडला.
रात्री राजेशला बेशुद्ध अवस्थेत कूपर रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी राजेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवाल पोलिसांना नुकताच प्राप्त झाला. राजेशचा गळा आवळला गेल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद होते. जुहू पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला. परिमंडळ 9 चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक अजितकुमार वर्तक यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक अशोक मोरे, सहाय्यक निरीक्षक प्रवीण प्रभू यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सुमन, दुर्गेश्वरी आणि कृष्णाची चौकशी केली. चौकशीत हा प्रकार समोर आला. राजेशच्या हत्येप्रकरणी त्या तिघींना जुहू पोलिसांनी अटक केली. आज त्या तिघींना अटक करून न्यायालयात हजर केले होते.


























































