मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीचे तीन उमेदवार रिंगणात

विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवाजी शेंडगे, भाजपकडून शिवनाथ दराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव नलावडे हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीतील तीन पक्ष समोरासमोर आल्याचे चित्र आहे.

आगामी विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून शिवाजी शेंडगे यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. त्यामुळे मुंबईतील शिक्षक मतदारसंघासाठी होणाऱया निवडणुकीसाठी आता महायुतीतील तीन पक्ष आमने सामने येत आहेत.विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. या मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ज. मो. अभ्यंकर रिंगणात आहेत.

विधानसभेच्या चौदा जागा रिक्त

लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानसभेतील सात आमदार विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. यापूर्वी दोन आमदारांनी दिलेला राजीनामा व चार आमदारांचे निधन यामुळे विधानसभेच्या सध्या चौदा जागा रिक्त आहेत.  विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 27 तारखेपासून सुरू होत आहे, पण या अधिवेशनात एकूण चौदा जागा रिक्त असतील.