
मराठा आरक्षणासाठी सुरू झालेले आंदोलन चिघळले असून, मराठवाड्यात शनिवारी तीन आंदोलकांनी आत्महत्या केली. बीड जिल्ह्यातील गिरवली येथे तरुणाने पाण्याच्या टाकीवरून उडी मारली, तर लातूर जिल्ह्यातील एका आंदोलकाने विष घेतले आणि दुसर्याने पुण्यातील इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील शत्रुघ्न काशिद हा तरुण शुक्रवारी रात्री आरक्षणाच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढला. पाण्याच्या टाकीवरून खाली उतरावे म्हणून पोलिसांनी त्याला विनंती केली. परंतु तो मागणीवर ठाम राहिला. रात्री 11.30 वाजता त्याने टाकीवरून उडी मारली. मराठा आरक्षण मिळेपर्यंत शत्रुघ्नवर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत, अशी भूमिका घेत आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडले. प्रशासनाने वारंवार विनंती करूनही आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते.
लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातील ढालेगाव ग्रामपंचायतीचा सदस्य असलेल्या महेश बाबूराव कदम (26) या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने ‘दुष्काळ जगू देत नाही, आरक्षण शिकू देत नाही’ अशी चिठ्ठी लिहून ठेवली. ढालेगाव येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उंबरदरा गावचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व्यंकटराव नरसिंग ढोपरे यांनी पुण्यात इंद्रायणी नदीत उडी मारून आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनीही चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.






























































